शनिवार 19 फेब्रुवारी 2011

‘स्वत्वासाठी स्वदेशी’ : लेखांचे दुवे

सध्या एका लेखमालेच्या प्रकल्पासाठी मी लेखन करीत असल्यामुळे या ब्लॉगवर काही नवीन लिहिता आलेले नाही. दैनिक तरुण भारत (नागपूर) मधील स्वदेशीया विषयासंबंधी लेखमालेत प्रकाशित झालेल्या माझ्या लेखांचे दुवे (link) खालीलप्रमाणे -


लेखांक २- स्वदेशीग्राहक व्रत :
http://tarunbharat.net/news.detail/news_id/173088

लेखांक ३- स्वभाषा’ - पूर्वार्ध :
http://tarunbharat.net/news.detail/news_id/175036

लेखांक ४- स्वभाषा’ - उत्तरार्ध :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/175338

लेखांक ५- छत्रपतींचा स्वदेशी बाणा’ :
http://tarunbharat.net/news.detail/news_id/176935

लेखांक ६- विज्ञाननिष्ठ स्वदेशी :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/179306

लेखांक ७- स्वदेशी वेशभूषा :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/180644

लेखांक ८- स्वदेशीवास्तुरचना :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/182607

लेखांक ९ - स्वदेशीगृहसजावट :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/184461

लेखांक १० राष्ट्रीय सौर दिनदर्शिका :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/186352

लेखांक ११ स्वदेशी कालगणना पद्धती :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/188307

लेखांक १२ स्वदेशी आरोग्यशास्त्र :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/190977

लेखांक १३ स्वदेशी आहारपद्धती :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/192480

लेखांक १४ पर्यावरण आणि स्वदेशी :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/194305

लेखांक १५ स्वदेशी भावना :

http://tarunbharat.net/news.detail/news_id/196462

यावर टिचकी मारल्यावर तरुण भारत च्या मूळ संकेतस्थळावरील लेख वाचता येतील.

आपला अभिप्राय अवश्य कळवा. धन्यवाद.

सोमवार 20 डिसेंबर 2010

खुदा मेहेरबान तो गधा पहेलवान !

कलावती बांदुरकर हे नाव आता अनेकांच्या तोंडात रुळले आहे. विदर्भातल्या शेतकर्‍यांचे प्रश्न चव्हाट्यावर येणे सुरु झाले, की या नावाचा उल्लेख हा होतोच. होय, ही तीच कलावती, जिच्या घरी ‘युवराजांनी’ (तोच गांधींचा ४० वर्षांचा ‘मुलगा’ - राहुल) भेट दिली, आणि जिचे नाव नऊ वेळा संसदेतल्या आपल्या भाषणात घेतले. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील हायवेलगतच्या जळका या गावात दोन मुले, सात मुली, आणि जावई अशा ‘भरलेल्या’ कुटुंबासमवेत कलावतीबाई राहतात.

दीड वर्षाआधी कलावतीच्या नवर्‍याने शेतीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. मात्र गेल्या वर्षी राहुलबाबांनी तिच्या घरी भेट दिल्यानंतर तिची परिस्थिती अशी सपाट्याने बदलली, की खुद्द तिनेसुद्धा याची कल्पना केली नसेल. संपूर्ण देशातल्या मीडियाने या कलावतीला राहुल गांधींनी संसदेत केलेल्या भाषणानंतर डोक्यावर घेतले होते. तिच्याकडे देशभरातून मदतीचा ओघ येऊ लागला. महाराष्ट्र सरकार, काही इतर राज्य सरकारे, धनाढ्य व्यक्ती, इ. नी तिला भरघोस आर्थिक मदत केली. एकूण ९०००० रुपयांचे कर्ज असलेल्या कलावतीला मिळालेल्या मदतीचा आकडा मात्र काही लाखांत गेला. हे सर्व कमीच होते की काय म्हणून, ‘सुलभ इंटरनॅशनल’ ने तिच्या खात्यात ३० लाखांची घसघशीत रक्कम जमा करून तिला त्यावर दरमहा २५००० रु. व्याज म्हणून मिळत राहतील, याची व्यवस्था केली. केवळ आर्थिक मदतच नाही, तर अनेक वस्तूही तिला मदत म्हणून मिळाल्या. वीज जोडणी, शिलाई मशीन, म्हशी, बकर्‍या, घर, टीव्ही, डिश एंटिना, इ. सोयीही तिला राहुलजींच्या कृपेने मिळाल्या. शेकडो पत्रकारांनी तिच्या मुलाखती छापल्या, आणि कित्येकांनी तिचे इंटरव्ह्यू आपल्या ‘२४ तासांत’ दाखवले. तीही या प्रसिद्धीला आणि झटपट मिळालेल्या श्रीमंतीला इतकी सरावली की तिची राहणीच बदलली, आणि जणू काही झालेच नाही अशी एखाद्या नेत्याच्या थाटात कॅमेराला सामोरी जाऊ लागली. राहुलबाबामुळे तो दिवसही तिच्या आयुष्यात आला, जेव्हा पूर्णपणे अशिक्षित असलेल्या या बाईला विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याकरिता जावे लागले. नंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या, आणि तिने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र त्यावेळीही नेता म्हणून तिची डिमांड वाढली होती.

आता यावेळी तिची आठवण होण्याचे कारण म्हणजे, तीन दिवसांपूर्वी (ता. १८) तिच्या संजय काळस्कर नामक जावयानेदेखील कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची बातमी आली, आणि पुन्हा सर्वांच्या नजरा कलावतीकडे वळल्या. ऐकीव माहितीप्रमाणे हा तिचा जावई (घरजावई) दारूडा होता, आणि शेतीकडे त्याचे मुळीच लक्ष नव्हते. किंबहुना कलावतीला भरघोस मदत मिळाल्यावर तर त्याने काही काम करणेही बंद केले होते. कलावतीची आणि तिच्या या दारुड्या जावयाची देशभरातील जनतेला उजळणी घडवण्यासाठी त्यादिवशी २४ तास रिकामटेकड्या असलेल्या वाहिन्यांनी जिवाचे रान केले. सरकारी ‘सह्याद्री’ वाहिनीसकट सर्वांनी ब्रेकिंग न्यूजच्या पट्ट्या फिरवल्या. सर्व वृत्तपत्रांनी तिच्या जावयाच्या मृत्यूची बातमी एखाद्या व्हीआयपीच्या मृत्यूप्रमाणे ठळकपणे छापली.

कलावतीला राहुलजींमुळे मिळालेल्या या अनावश्यक मदती-प्रसिद्धीमुळे जणू काही ही एकच भीषण आत्महत्या शेतीच्या कर्जापायी झाली, इतर सर्वांनी केवळ हौस म्हणून आत्महत्या केल्या, असे वाटू लागले. खरे पाहता, इतकी भरघोस मदत मिळालेले एकही शेतकरी कुटुंब विदर्भात नसेल. कलावतीपेक्षाही बिकट संकट ओढवलेल्या, आणि एक दमडीही मदत म्हणून न मिळालेल्या शेतकरी विधवा विदर्भात आहेत, पण त्या मात्र कमनशिबी ! त्यांच्याकडे कुठे आला होता राहुल ? त्या बिचार्‍या सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवत त्याकडे डोळे लावून बसलेल्या. युवराजांनी एकदा भेट काय दिली आणि या कलावतीबाईचे आयुष्यच पालटून गेले. नशीब असावे तर असे. त्या भेटीच्या रात्रीनंतर तिचा एक दिवसही कष्टात गेला नसेल. घर-दार प्रसिद्धी तर मिळालीच, शिवाय मुलाबाळांसकट बसून खाण्याएवढा पैसादेखील गोळा झाला. ही केवळ राहुल-भेटीची किमया.

आज विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा नेमका आकडादेखील शासनाजवळ नाही. पॅकेज जाहीर केले, पण त्याची रक्कम सरकार-दरबारातून हातात येईपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक आकडे गळालेले असतात. सरकारने जागोजागी वीज प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून ठेवल्या, मात्र अजूनही त्यातून निर्माण झालेली वीज सरकार शेतीच्या पंपाकरिता देत नाही. कित्येक आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या बायकापोरांना दोन वेळचे अन्न नीट मिळत नाही, पण तिकडे कानडोळा करत युवराजांचे चमचे मात्र त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कलावतीला डोक्यावर बसवून नाचण्यातच धन्यता मानतात. कारण “खुदा मेहेरबान तो गधा पहेलवान !”

म्हणूच राहुलजी, एकदा तुम्ही विदर्भाच्या दौर्‍यावर याच ! तुमच्या पावलांनी पावन झाल्यामुळे जर अशी पैशांची गंगा अवतरत असेल, तर इथल्या हजारो इतर कलावतीदेखील तुम्ही घरी येण्याची वाट पाहत आहेत.

गुरुवार 16 सप्टेंबर 2010

सावधान, ड्रॅगन विळखा घालतोय !

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारतविरोधी कारवायांनी जोर धरला आहे. भारत सरकार जरी चीनच्या कारवायांना गंभीरतेने सामोरे जात नसले, तरी चीनद्वारे भारतावर विविध मार्गांनी सुनियोजित रितीने होणारे आक्रमण ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब आहे. सामान्य नागरिकांनी याबद्दलची काही सत्ये जाणून घेणे आणि या आक्रमणाला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भौगोलिक आक्रमण :
भारताच्या भूमीवर आक्रमण करण्याचे चीनचे मनसुबे काही नवे नाहीत. १९६२ च्या युद्धापासून आणि तिबेटवर ताबा मिळविल्यापासून भारताच्या भूमीवर चीनचा डोळा आहे, हे उघड झाले आहे. कित्येक लोकांना भारताला केवळ पाकिस्तानचा धोका आहे असे वाटते, परंतु पाकिस्तानपेक्षाही कितीतरी पटीने अधिक प्रमाणात चीन भारताच्या सीमावर्ती भागांत आपली हालचाल वाढवीत आहे. चीनचा धोका फक्त लोहपुरुष सरदार पटेलांनी ओळखला होता व ‘देशाला खरा धोका पाकिस्तानपेक्षा चीनकडून आहे’ असा इशारा दिला होता. परंतु समाजवादाचे कातडे डोक्यावर पांघरलेल्या आपल्या देशातील विचारवंतांनी चीन-प्रेमापायी सरदार पटेलांची ‘भांडवलशाहीचे पुरस्कर्ते’ अशी संभावना केली. पाकिस्तानप्रमाणेच चीननेदेखील काश्मीरचा एक मोठा भूभाग बळकाविला आहे, आणि आजतागायत तेथे चीनचा कब्जा आहे, ही बाब अनेकांना अजूनही माहीत नाही. काश्मीरच्या उत्तर-पूर्वेचा हा भाग ‘अक्साई-चीन’ म्हणून ओळखला जातो. अजूनही या चीन-व्याप्त काश्मीरात भारतीय सैन्याला शिरकाव करता आलेला नाही. किंबहुना, दिवसेंदिवस येथील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याबाबत भारत सरकार मूग गिळून स्वस्थ बसलेले आहे. भारतीय सेनेच्या जवानांवर चिनी हद्दीतून छुपे हल्ले होत असताना आपले संरक्षण व परराष्ट्रमंत्री कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. उलट भारत सरकारने ‘चीनने भारतात घुसखोरी केलेलीच नाही’ असे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून तर चीन अरुणाचल प्रदेशावरही आपलाच दावा सांगत आहे. अरूणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचे चीनने गेल्या वर्षांत किमान ५ ते ७ वेळा ठणकावले आहे. हे कमी झाले म्हणून की काय, भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, दलाई लामा यांच्या अरूणाचल दौर्‍याला चीनने आपला औपचारिक विरोध नोंदविला होता. अरूणाचल प्रदेशात भारताने निवडणुका घेऊ नये असे म्हणण्यासदेखील चीन कचरला नाही. याला उत्तर म्हणून भारताने काय केले ?, तर केवळ एक-दोन वेळा भारतातल्या चिनी राजदूतांना आपला पुळचट विरोध कागदोपत्री कळविला. नंतर भारताच्या राष्ट्रपतींच्या चीन-दौर्‍यात यावर एक अवाक्षरही भारतातर्फे काढण्यात आले नाही. भारत सरकारच्या अश्या नरमाईच्या धोरणामुळे चीन वारंवार भारताच्या भूमीवर अतिक्रमण करायला धजावतो आहे. चिंतेची बाब अशी, की या वेळकाढू धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारत आणि चीन यांच्यामध्ये भूमीवरून वाद आहे, असा संदेश जातो आहे. वास्तविक, अरूणाचल प्रदेश आणि काश्मीर दोन्हीही भारताचे अविभाज्य भूप्रदेश आहेत, आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भारत सरकारची आहे. यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु आंतराष्ट्रीय समुदायाला हे पटवून देण्यात भारत बहुधा कमी पडतो आहे. उदा. गूगल आणि विकिपिडीया या दोन्ही लोकप्रिय सर्च इंजिनवर भारताच्या नकाशाबद्दल माहिती शोधल्यास, हा प्रदेश (चीनव्याप्त काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश) ‘वादग्रस्त प्रदेश’ (in dispute) म्हणून दाखविण्यात येतो. तसेच, भारताचा म्हणून जो नकाशा दाखविण्यात येतो, त्यात पाकव्याप्त आणि चीनव्याप्त काश्मीर दाखविला जात नाही. केवळ ताबारेषेपर्यंतचा भूभागच काश्मीर म्हणून दर्शविण्यात येतो. त्यामुळे सर्व जगात हा बळकावल्या गेलेला प्रदेश भारताचा नाही, तर वादग्रस्त आहे असा संदेश पसरतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शासन याबाबतीत काहीही करीत नाही.
अरुणाचल प्रदेशाजवळील तिबेटी भूभागावर चीनने यापूर्वीच रस्तेबांधणीचे काम हाती घेतले आहे. भारतातर्फे जेथे अजूनही भौगोलिक परिस्थितीचे कारण पुढे करुन कच्चे रस्ते बनविले जातात, तेथे चीन पक्के सिमेंटचे महामार्ग बांधत आहे, आणि पुढे-मागे इथपर्यंत लोहमार्ग पसरविण्याचीदेखील चीनची तयारी आहे. भारतीय सैनिकांना अजूनही या भागात गस्त घालण्याकरिता कित्येक किलोमीटर पायी चालत जावे लागते. मात्र चीनने सीमारेषेवर मोठमोठ्या सैनिकी चौक्या उभारल्या आहेत. या सर्वांवरून चीनच्या या भागातील दळणवळण सुविधांची कल्पना येऊ शकते. आता तर या भागात ब्रह्मपुत्रा नदीवर चीन एक महाकाय धरण बांधणार असल्याचेदेखील वृत्त आहे. हा एक साधा जलविद्युत प्रकल्प असल्याचे चीन सांगतो आहे, मात्र अमेरिकी गुप्तवार्ता संस्थांच्या अहवालाप्रमाणे पूर्ण झाल्यावर हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे संपूर्ण पाणी अडवून धरण्याची क्षमता या प्रकल्पात राहणार आहे. भारताच्या उत्तर-पूर्वेकडील संपूर्ण शेती ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. चीनने हे पाणी अडवून धरल्यास, हा भाग नक्कीच प्रभावित होईल. भारतात जाणार्‍या ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर आपले नियंत्रण मिळविण्याचे चीनचे हे षड्‌यंत्र भारतीयांनी मात्र अजून ओळखलेले नाही असे दिसते.
या सर्व उघड कारवायांसोबतच भारतातील नक्षलवादी, आणि माओवादी हिंसाचाराला अप्रत्यक्षपणे पाठबळ आणि आर्थिक-शस्त्रास्त्रांची मदत चीनकडून सुरु आहे.

चीनची पाकिस्तानशी सलगी चिंताजनक :
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची चीनशी वाढत चाललेली सलगी भारताकरिता डोकेदुखी ठरू शकते. ‘अक्साई-चीन’ हा भाग पाक-व्याप्त काश्मीरला लागूनच असल्यामुळे, चिनी हद्दीतून थेट पाकिस्तानमध्ये जाणे फारच सोपे आहे. भारताने कित्येक प्रयत्न करुनही ६० वर्षांत अजून काश्मीरमध्ये हव्या त्या प्रमाणात रस्ते तयार झालेले नाहीत, मात्र चीनने या अतिशय उंच आणि डोंगराळ भागातही प्रतिकूल हवामानात काही महिन्यांतच पाकिस्तानपर्यंत पक्के रस्ते बांधून घेतले आहेत, त्यामुळे पाकिस्तानपर्यंत मालवाहतूक करणे आता चीनला सोयीचे झाले आहे. पाकिस्तान सध्या त्याने बळकावलेल्या भारतीय भूप्रदेशाजवळच एक फार मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घालतो आहे. ‘चश्मा-२’ असे नाव असणार्‍या या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समितीचा विरोध झुगारून चीन सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. चीनकडून पाकिस्तानला हा प्रकल्प उभा करायला आर्थिक मदत, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ इ. उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकल्पातील रिऍक्टरदेखील चीनच पाकिस्तानला देणार आहे. एकप्रकारे ‘सबकुछ चिनी’ असलेला हा प्रकल्प २०१२ साली पूर्ण करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे.
या मदतीच्या बदल्यात पाकिस्तान आपल्या दक्षिणेकडील बलुचिस्तान भागातील ‘ग्वादर’ बंदरात चीनला सशस्त्र नाविक तळ उभारण्यासाठी जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या बंदराच्या माध्यमातून चीनने आपला अरबी समुद्रात प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे कधीकाळी अतिशय सुरक्षित समजला जाणारा भारताचा पश्चिम तटही चीनच्या टप्प्यात आला आहे. चीनमधून थेट या बंदरात मालवाहतूक तसेच सैनिकी-साहित्य वाहतुकीसाठी एक एक्सप्रेस-वे बनविण्यात येत असून त्या मार्गात ठिकठिकाणी एकूण २२ ठिकाणी बोगदे खणण्यात येत आहेत. हे बोगदे उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून खणण्यात येत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही रडारचा परिणाम होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्याबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात येत आहे. पाकिस्तानी कर्मचार्‍यांनाही या ठिकाणी येण्यास मज्जाव आहे. इराण ते चीन गॅस पाइपलाइनसाठी हे बोगदे आवश्‍यक आहेत, असे चीन सांगत असला, तरी क्षेपणास्त्रांचा साठा करण्यासाठी चीन त्यांचा वापर करणारच नाही, अशी खात्री कुणीही देऊ शकत नाही.
चीन आणि पाकिस्तान दोघेही हे म्हणजे प्रकल्प विकासकार्ये असल्याचे भासवित आहेत. मात्र भारताचे हे दोन्हीही परंपरागत शत्रू एकमेकांशी हातमिळवणी करून भारताविरूद्ध काही षड्‌यंत्र तर रचत नाहीत ना, याचा शोध गुप्तचर खात्याने घेणे आवश्यक वाटते.

सैनिकी तळ आणि लष्करी कारवाया :
अमेरिकी लष्कराचे केंद्र पेंटॉगॉन ने दिलेल्या एका अहवालानुसार चीन संपूर्ण दक्षिण आशियाई महासागरावर (अरबी समुद्र+हिंदी महासागर) नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पावले उचलतो आहे. ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’(मोत्यांचा धागा) असे या मोहिमेला नाव दिले गेले आहे. सद्यपरिस्थितीत चीनचे भारतानजीकच्या देशांत एकूण ९ ठिकाणी आपले नाविक तळ ठोकले आहेत. यात बांग्लादेशातील नाविक अभ्यास तळ, बर्मामधील चित्तगाँग येथे नाविक हेरगिरी आणि व्यावसायिक तळ, थायलंडजवळीन क्रा कॅनल येथे नाविक सुविधा केंद्र, व्हिएतनाममधील हाईयन येथे नौदल तसेच हवाईदलाचा बेस कॅम्प, फिलिपाईन्सनजीकच्या वूडी आयलण्डस्‌ आणि साऊथ चायना येथे समुद्री तळ, श्रीलंकेतील हंबनटोटा येथे सध्या १ अरब डॉलर खर्चून बांधत असलेला नाविक तळ आणि आता पाकिस्तानमधील ग्वादर तेथील बंदर यांचा समावेश आहे. याशिवाय अंदमान निकोबार बेटाजवळ म्यानमारच्या मालकीच्या कोको बेटावर चिनी नाविक दले यापूर्वीच उपस्थित आहेत. चीनने जरी ही सर्व बंदरे आखाती देशांमधून तेल आणण्याकरिता बांधत असल्याचे सांगितले असले, तरी या बंदरांवर दिवसेंदिवस वाढत असणारी चिनी पाणबुड्या आणि सैनिकांची संख्या चीनचे मनसुबे स्पष्ट करणारी आहे. चीनची ही तयारी वाढते आक्रमक धोरण पाहता, भारताच्या नाविक दलावर दोन्ही बाजूंनी मारा करायची तयारी चीनने ठेवलेली आहे, हे आता सर्व निरीक्षक मान्य करू लागलेले आहेत. सोबतच्या नकाशात पाहिल्यास, भारताला समुद्री मार्गाने चहूबाजूंनी घेरण्याचा चीनचा हा कुटिल डाव आहे, असे लक्षात येईल.
हे झाला समुद्री मार्गाने भारताला घेरण्याचे षड्‌यंत्र. यासोबतच भारताच्या उत्तर सीमेचा नेपाळ सोडून सर्व प्रदेश चीनने व्यापून टाकला आहे. या भागांत चीनचे सैन्य मोठया प्रमाणावर आहे. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क टाईम्स ने दिलेल्या वृत्तात सध्या या भागात चिनी लष्कराचे सात ते अकरा हजार सैनिक तैनात असल्याचे म्हटले आहे. भारताने या वृत्तानंतर याबाबत चीनला विचारणा केली असता, हे सर्व सैनिक पाकमध्ये नुकत्याच आलेल्या पुरात सापडलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी आल्याचे चीनतर्फे सांगण्यात आले. वास्तविक बचाव कार्यासाठी आलेल्या सैनिकांजवळ मोठमोठ्या युद्धसाहित्याची गरज नसावी, परंतु हे सर्व सैनिक अतिशय प्रगत शस्त्रास्त्रे जवळ बाळगून आहेत. परदेशी गुप्तचर सूत्रांचा हवाला देऊन वृत्तात पुढे म्हटले आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी येथे तात्पुरते निवारे उभे केले असून, त्यांच्यावर सोपविलेली बांधकामे पूर्ण झाल्यानंतर ते परत जाणार आहेत, असे चित्र सुरवातीला निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता या भागात प्रचंड मोठी निवास संकुले बांधली जात आहेत. त्यातून प्रदीर्घ काळ येथे मुक्काम ठोकण्याचा चिनी लष्कराचा मनसुबा स्पष्ट होतो. हे सर्व कमी पडत होते म्हणून की काय, भारताच्या लष्करी अधिकार्‍यांना व्हिसा नाकरण्याचा उद्दामपणाही चीनने सुरु केला आहे. ‘जे यार्डा-यार्डाने बळकावता येत नाही ते इंचा-इंचाने बळकवा’ या माओच्या संदेशाचे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी तंतोतंत पालन करीत आहे.
या सर्व घडामोडी चालू असताना काँग्रेसशासित अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांनी चीनच्या कारवायांना आताच पायबंद घातला नाही तर पुढे मोठी समस्या उद्‌भवू शकते असे केंद्र सरकारला ठासून सांगितले आहे. याच प्रदेशातून निवडून गेलेले कॉंग्रेस पक्षाचे खासदार तेकम संजय यांनीही केंद्र सरकारच्या थंड भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केलेली आहे. स्वपक्षीय राज्य सरकारांकडून हा घरचा अहेर मिळूनही सरकार या बाबतीत काही ठोस पावले उचलतांना दिसत नाही. भा.ज.पा., रा.स्व.संघ इ नी देखील सरकारला वेळोवेळी चीनच्या मनसुब्यांबद्दल सावध केले आहे.

आर्थिक आक्रमण :
या वर उल्लेख केलेल्या आक्रमणात तरी आपल्याला शत्रू ओळखणे सोपे असते, परंतु भौगोलिक आक्रमणांसोबतच चीन आपल्या छुप्या आक्रमणाद्वारे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थाच खिळखिळी करू पहात आहे. भौगोलिक दृष्टीने अतिप्रचंड असलेल्या या चीन देशात शेती करायला आणि औद्योगिकीकरणासाठी मुबलक जागा आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असल्यामुळे ‘मानव’ हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक आहे, आणि त्याचीही काही कमी नाही. असंख्य कामगार उपलब्ध असल्यामुळे मजुरीचा दर अत्यल्प आहे. माल तयार करण्याचा खर्च कमी आहे. त्यामुळेच माल विकण्यासाठी जी किंमत आकारली जाते तीही तुलनेने कमीच. म्हणूनच या वस्तू चिन्यांना अतिशय स्वस्त दरात विकता येतात.
चिनी व्यापारी फार धूर्त आहेत. चीनमधून प्रत्येक देशात जाणार्‍या मालाच्या प्रकारात व दर्जात विषमता असते. स्पष्ट करून सांगायचे म्हणजे चीनने अमेरिकेला पाठवलेला माल व भारतात पाठवलेला माल यांच्यात बराच फरक असतो. एकतर प्रत्येक देशातील लोकांच्या वस्तूंची गरज, आवड निरनिराळी असते. त्याप्रमाणेच लोकांची खरेदीची क्षमताही वेगवेगळी असते. याच गोष्टी निर्यातीतील फरकाला कारणीभूत आहेत. उत्तम दर्जाची महागडी वस्तू कितीही सुंदर आणि उपयुक्त असली तरी भारतीय बाजारातून जलद विकली जाईलच अशी शक्‍यता कमी असते, मात्र तीच वस्तू वेगळे साहित्य वापरून स्वस्त बनविल्यास भारतीय ग्राहक त्याच्या दर्जाकडे लक्ष देत नाही, हे चिनी व्यापार्‍यांनी ओळखले आहे. अशाप्रकारे प्रत्येक देशातील ग्राहकाच्या सवयींचा नीट अभ्यास करून त्या त्या प्रमाणे बदल करून वस्तू निर्यात करण्याचे ‘चातुर्य’ चीनकडे आहे. मागण्यांच्या अभ्यास करून त्या उत्पादकापर्यंत पोचविण्याचे चिनी व्यापार्‍यांचे हे ‘नेटवर्क’ आणि त्याची गती चकित करुन सोडणारी आहे. उदा. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. रेड्डी यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आठव्या दिवशी स्थानिक बाजारात त्यांचे फोटो असलेल्या चीननिर्मित वस्तू उपलब्ध झाल्या होत्या. यावरून त्या गतीचा अंदाज येऊ शकतो. जपानसारख्या नावीन्यपूर्ण वस्तूंचा शोध लावणार्‍या देशाकडून माहिती मिळवणे, त्यातील बारकावे समजून घेणे व त्याची चक्क नक्कल करणे यातही चीन मागे नाही. चिनी लोक कोणत्याही नव्या वस्तूची प्रतिकृती अशी तयार करतात की ती अगदी मूळचीच वाटावी. ‘मागणीनुसार पुरवठा’ हे तत्व चिनी व्यापारी काटेकोरपणे पाळत आहेत. अशाप्रकारे संपूर्ण जगात हे मेड इन चायना चे जाळे विणल्या जात आहे.
भारतवर्षात सध्या जे चिनी बनावटीच्या वस्तूंचे आक्रमण झाले आहे त्याचा येथे विचार करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक वस्तू ही ‘मेड इन चायना’ झाली आहे. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून तर वातानुकूलित मॉलपर्यंत सर्वच ठिकाणी या वस्तूंनी आपले बस्तान जमविले आहे. भारतातील दैनंदिन वापराच्या कित्येक वस्तू आज चीनमधून येतात. बहुतांश वेळी या वस्तू कर बुडवून, विनातपासणी आणि तस्करीच्या मार्गाने भारतात आणल्या जातात. या वस्तू तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला आहे, वस्तूंचा दर्जा काय आहे, इ. कशाचीही तपासणी केली जात नाही. आजच्या घडीला भारतातील लहान मुलांच्या खेळण्यांची संपूर्ण बाजारपेठ चीनच्या कंपन्यांनी काबीज करून टाकलेली आहे. भारतीय कंपन्यांचे खेळणे बाजारात नावालासुद्धा आढळत नाही. स्टेशनरी साहित्याच्या बाजारपेठेतही चीनचा बोलबाला आहे. अतिशय स्वस्त प्लास्टिकच्या स्केल, विविधरंगी पेन्सिली, खोडरबर, स्वस्त किमतीचे पेन, इ. लेखनसाहित्य मोठ्या प्रमाणात चीनमधून भारतात येते. रबरी आणि प्लास्टिकच्या घरगुती वस्तू जसे, लहान-मोठे डबे, पिशव्या, सफाईचे ब्रश, बादल्या, रबरी चपला, इ. देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबरच सणासुदीकरिता लागणार्‍या वस्तूदेखील चिनी व्यापारी बाजारात आणतात.
अतिशय स्वस्त आणि आकर्षक दिसणार्‍या या सर्वच वस्तूंचा दर्जा केवळ फेकण्यायोग्यच असतो असे नव्हे, तर कित्येकदा या वस्तू आरोग्याला हानिकारकदेखील असतात. मात्र स्वस्तात मिळत असल्यामुळे कश्याही असल्यातरी त्या विकल्या जातात. उदा. सोबतच्या चित्रात चिनी बनावटीच्या दर्जाहीन स्लीपर्स वापरल्यामुळे पायावर झालेला परिणाम दिसत आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमधून लोंढे महाराष्ट्रात येतात आणि मराठी तरुणांच्या नोकर्‍या हिसकावून घेतात, हे आपण रोज ढोल बडवून सांगतो, पण चीनमधील या वस्तूंच्या लोंढय़ामुळे आपल्या देशातील कारागीर मरतो आहे, याची जाणीव आपल्याला का होत नाही ? गांधीजींनी ग्रामोद्योग आणि कुटिरोद्योगाचा पुरस्कार केला, त्यात विशालदृष्टी होती. कमीतकमी रोजच्या व्यवहारातल्या वस्तू तरी आपल्या समाजातून तयार व्हाव्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारावी हा त्यांचा त्यामागे हेतू होता. मात्र आता आपण सर्वच लहानसहान वस्तूंकरिता चीनवर अवलंबून राहत आहोत. आज या विषयाकडे कोणताही राजकीय पक्ष गंभीरपणे बघत नाही. चीनचे आक्रमण आपण कसे रोखणार आहोत, देशपातळीवर आणि राज्यपातळीवर या विषयावर काय उपाय योजण्यात येणार, याबद्दल कोणाच्याही जाहीरनाम्यात काहीच उल्लेख दिसत नाही.

तंत्रज्ञानावरील आक्रमण :
या बारीक डोळेवाल्यांचा बोलबाला केवळ लहानसहान वस्तू उत्पादनातच आहे असे नाही. चीनमध्ये सर्व प्रकारचा माल बनविण्याचे उद्योगधंदे आहेत. अगदी लहानसे रबरबॅण्ड बनविणार्‍यापासून तर मोठमोठी यंत्रे बनविणार्‍यांपर्यंत सर्व प्रकारचे ‘स्किल्ड लेबर’ चीनमध्ये मोठ्या संख्येत आहेत. जगातील कोणत्याही तंत्रज्ञानाची रातोरात ‘कॉपी’ चीनमध्ये तयार होते. आणि मग जणू काही आपणच हे तंत्र बनविले आहे, अशा थाटात चिनी कारागीर त्याचा सर्रास वापर करीत सुटतात. कोणत्याही क्षेत्रातील तंत्रज्ञान असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत, किंवा संगणकाचे सुटे भाग असोत, खेळाचे साहित्य असो, किंवा मोबाईल संच असोत, चीन काहीही तयार करण्यात आघाडीवरच आहे. त्यामुळे कित्येक जागतिक ख्यातीप्राप्त कंपन्या आपला माल चीनमध्येच बनवून घेतात, आणि त्यावर केवळ आपले नाव घालून विकतात. म्हणजे पाकिटावर मोठ्या ब्रॅण्डचे नाव, पण आतमध्ये ‘चायना माल’, हे चित्रही आता नवे नाही. त्यांना इतर कुठेही माल बनविण्यापेक्षा चीनमध्ये माल बनवून घेणे सोयीचे वाटते. कारण, चिनी मजूर इतर कुठल्याही मजुरांपेक्षा कमी पैशावर काम करण्यास तयार असतात, आणि ते संपही करीत नाहीत. त्याचबरोबर नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण होते. यामुळे चिनी कंपन्यांना वस्तू निर्मितीचे कंत्राट देणे नफ्याचे ठरते, असा दावा केला जातो.
याउलट अजूनही भारतात अनेक मूलभूत यांत्रिक भागांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही. वापरयोग्य वस्तू बनतात. पण त्यात वापरलेले सुटे भाग आयातीत असतात. एक उदाहरण घेऊया. भारतात सध्या गुजरात, झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा इ. राज्यांत जे मोठमोठे विद्युत प्रकल्प उभे होत आहेत, त्यात यांत्रिक सुटे भाग पुरविण्याचे कंत्राट चिनी कंपन्यांना दिलेले आहे. एका सर्वेक्षणानुसार चिनी कंपन्यांना अंदाजे ५० हजार कोटी रुपयांची कामे या सर्व विद्युत प्रकल्पांत मिळालेली आहेत. चिनी कंपन्या कामासाठी स्वतःचे मजूर आणि अभियंते आणतात. या प्रकल्पांतील सुमारे ७०% यंत्रे चिनी कामगार आणि अभियंते उभी करीत आहेत. अनेक चिनी कंपन्या आपल्या कामगारांना भारतात तीन महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर आणतात. अन्य कोणत्याही देशात इतक्‍या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणले जात नाही. यामुळे संबंधित क्षेत्रातील बेरोजगार भारतीय अभियंते आणि कुशल कामगारांत असंतोष निर्माण होते.
वीजक्षेत्राबरोबरच दूरसंचार क्षेत्रातही चिनी कंपन्या भारतात जाळे विणत आहेत. नियम मोडून निर्माण केले गेलेले आणि स्वस्त किमतीचे चिनी मोबाईल संच गेली काही वर्षे भारतात धडाक्यात विकले गेले. शेवटी सरकारला त्यांवर बंदी आणावी लागली. देशाच्या दूरसंचार क्षेत्रात चीनचा वाढता वावर ही गुप्तचरांसाठी चिंतेची बाब बनली आहे. चिनी कंपन्यांसाठीचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे कडक असावीत आणि त्यांची अंमलबजावणीही त्याच प्रकारे व्हावी, असे गुप्तचरांना वाटते. दूरसंचार क्षेत्रातील चिनी कंपन्यांवर काही निर्बंध घालणे आवश्‍यक आहे. विशेषतः काही चिनी उत्पादनांबाबत हे पाऊल उचलायला हवे. संवेदनशील असलेल्या सीमाभागांत भारतीय दूरसंचार कंपन्यांनी चिनी उत्पादनांचा वापर करू नये, असा आदेश गुप्तचरांच्या इशार्‍यानंतर केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. चिनी दूरसंचार उत्पादनांत हेरगिरीला पूरक बाबी असतील, अशी शंका केंद्रीय गृह विभागाला आणि गुप्तचर विभागाला आली आहे.
या सोबतच संगणकविश्वात देखील चीनने आपला उपद्व्याप मोठ्या प्रमाणात सुरु केला आहे. अनधिकृतरीत्या संगणकातील माहिती चोरण्यात (याला हॅकिंग असे म्हणतात.) चिनी हॅकर्सचा जगात क्रमांक पहिला लागतो. चिनी सरकारचा या सर्व हॅकर्सना छुपा पाठिंबा असतो, असे निदर्शनास आले आहे. भारताला चीनच्या या आक्रमणाचाही फटका बसला आहे. सहा महिन्यांपूर्वी चिनी हॅकर्सनी भारतीय लष्कराचे संगणक हॅक करण्याचा प्रयत्न केला होता, ही गोष्ट सर्वांसमोर आहे. चीन सरकार आपल्या देशातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर विशेष लक्ष पुरवित असते, आणि आपल्या देशातील संवेदनशील माहिती जगापुढे जाणार नाही, याकडे त्यांची बारीक नजर असते. या जाचामुळे कंटाळूनच गूगल या जगप्रसिद्ध कंपनीने चीनमधील आपले कार्यालय बंद केले आहे.


सांस्कृतिक (जीवनशैलीवर) आक्रमण :
आपल्या वस्तूंबरोबरच आपली संस्कृतीही सर्वत्र फैलविण्याचे प्रयत्न चीन करीत आहे. आपल्या सणांला लागणार्‍या कित्येक वस्तू जसे, आकाशदिवे, पतंग, मूर्ती, कृत्रिम फुलांच्या माळा, सजावटीचे साहित्य, इ. थेट चीनमधून येत आहे. कलाकुसरीच्या वस्तू, शोभिवंत वस्तू इ. स्वस्त दरात तयार करण्यातदेखील चिनी कलाकार आघाडीवर आहेत. या वस्तू हळूहळू विविध प्रदर्शनांच्या आणि सेल च्या मार्फत आपल्या घरांघरांतून विराजमान होत आहेत. त्याचप्रमाणे आपले परंपरागत वास्तुशास्त्र सोडून चिनी वास्तुशास्त्र पद्धती ‘फेंग-शुई’ कडेही लोक वेगाने आकर्षित होत आहेत. कित्येक घरांत गृहिणींनी विविधरंगी बेडूक, ढेरपोटे चीनीबाबा, बांबूची बुटकी झाडे, इ. आणून बसविले आहेत. चिनी खाद्यपदार्थ केवळ शहरांमध्येच नव्हे, तर खेड्यापाड्यांतही गल्लोगल्ली हातगाड्यांवरून विकल्या जात आहेत. ‘चायनीस’ असे लिहिलेले हातठेले नूडल्सपासून नाना प्रकारचे चिनी पदार्थ लोकांना खाऊ घालण्यात अग्रेसर आहेत. जनुकीय परावर्तन केलेले, आरोग्यास हानिकारक रसायने असलेले पॅकबंद चायनीज खाद्यपदार्थदेखील विविध मॉल्समधून भारतात आता उपलब्ध झाले आहेत.
या सर्व बाबींचा उपयोग चिनी वस्तूंचे आणि पर्यायाने चीनचे नाव लोकांच्या तोंडावर कायम ठेवण्यात होत असतो. वेगवेगळ्या निमित्त्याने सतत लोकांसमोर येत राहिल्यामुळे ‘या वस्तूंशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच नाही’ ही भावना जनमानसात निर्माण होत असते. चीनला तर हेच हवे आहे !

उपाय :
सारा बोंगिऑर्नी नावाच्या कॅलिफोर्नियास्थित एका अमेरिकी पत्रकार बाईने तिच्या अनुभवावरून एक पुस्तक लिहीले आहे, त्याचे नाव आहे – ‘A year without Made In China.’ सारा आणि तिच्या परिवाराने २००५ साली चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देऊन पहायला संपूर्ण वर्षभर ‘मेड इन चायना’ चे लेबल असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकला होता. केवळ पारिवारिक स्तरावरील या विरोधामुळे तिला काय काय अनुभव आले, ते तिने शब्दबद्ध केले आहेत. त्या पुस्तकात ती लिहीते, ‘पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेला आपण खरेच तोंड देत भक्कमपणे तिच्या विरोधात जाऊ शकतो, का ? चिनी वस्तूंशिवाय आपण जगू शकतो का ? हो. जगू शकतो. मी जगून पाहिले आहे, आणि मी अनुभवावरून सांगू शकते, की सध्या तरी हे शक्य आहे. मात्र १०-१२ वर्षांनंतर मीच काय इतर कुणीही असा प्रयत्न करु शकेल की नाही, हे मी सांगू शकत नाही.”
सर्वच क्षेत्रात चीन आहे, तर त्याला का हरवायचे आणि कसे ? याला एकच कारण आहे, की चीन भरवश्याचा शेजारी नाही हे त्याने याआधीही दाखवून दिलेले आहे. तो आपला शत्रूच आहे. किंबहुना क्रमांक एकचा शत्रू आहे. भारताला आशिया खंडात महासत्ता म्हणून समोर येऊ द्यायचे नाही, हे चीनने ठरविले आहे. भारत सध्यातरी चीनपुढे थेट युद्धभूमीवर उतरु शकत नाही. म्हणून चीनच्या या आक्रमणाला आता नागरिकांनीच उत्तर देण्याची आवश्यकता आहे. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असल्यामुळे सरकार चिनी वस्तूंवर थेट बंदी घालू शकत नाही. मात्र जर नागरिकांनी या वस्तूंचा वापर करणेच बंद केले, तर या चिनी वस्तूंची आवक थांबू शकते. जे जे चिनी असेल, त्या सर्वांवर बहिष्कार टाकायला हवा. आणि चिनी वस्तूंना स्वदेशी पर्याय निर्माण करायला हवेत. हे कार्य जर प्रत्येक भारतीयाने राष्ट्रीय कर्तव्य समजून सुरु केले, तर चिनी मालाला भारतातून हद्दपार करायला आणि चीनचे कुटिल मनसुबे हाणून पाडायला वेळ लागणार नाही.

शनिवार 21 ऑगस्ट 2010

नांदी ‘शैक्षणिक सेझ’ ची

नांदी ‘शैक्षणिक सेझ’ ची
(विदेशी विद्यापीठांना परवानगी : भारताची शैक्षणिक पारतंत्र्याकडे वाटचाल)

केंद्रातील यूपीए-२ मंत्रिमंडळाने गेल्या मार्च महिन्यात परदेशी विद्यापीठांना भारतात आपले शैक्षणिक परिसर (campus) उघडण्यास परवानगी देणार्‍या एका विधेयकाला मान्यता दिली, आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी दि. ३ मे रोजी डाव्या पक्षांचा विरोध झुगारुन हे विधेयक लोकसभेत चर्चेकरिता मांडले. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे जर हे विधेयक चर्चेअंती पारित होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले, तर त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार करणारा हा लेख :

विधेयकात आहे काय ?

सर्वप्रथम हे विधेयक कशाबद्दल आहे, हे जाणून घेतले पाहिजे. या विधेयकाचे नाव The Foreign Educational Institutions (Regulation of Entry and Operations) Bill, 2010 - No. 57 of 2010, असे आहे. अशाचप्रकारचे एक विधेयक २००७ साली लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. त्या विधेयकालाही माकपा चा विरोध होता. त्यावेळी यूपीए-१ सरकारला माकपा चा बाहेरून पाठिंबा असल्याकारणाने सरकारने ते विधेयक लोकसभेत मांडण्याचे धाडस केले नाही. मात्र यूपीए-२ सरकार स्वबळावर सत्तेत आल्यानंतर शिक्षण खात्याचा कारभार एकहाती - कपिल सिब्बल यांच्याकडे आला, आणि त्यांनी “हे विधेयक संसदेत पारित करुन घेणे ही आपली प्राथमिकता राहील”, असे स्पष्ट केले. सिब्बल यांनी या विधेयकाबद्दल सांगतांना म्हटले आहे, “हे विधेयक भारतीय शिक्षण क्षेत्राकरिता मैलाचा दगड असून, यामुळे विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाच्या नवनवीन वाटा खुल्या होतील, आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल.” या कायद्यात सरकारतर्फे खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत:
१) विद्यमान कायद्यानुसार, आपल्याकडे देशी विद्यापीठे परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार करू शकतात. मात्र ही परदेशी विद्यापीठे स्वत:ची संकुले भारतात उभारु शकत नाहीत. आता येऊ घातलेल्या कायद्यामुळे ही परदेशी विद्यापीठे भारताच्या भूमीवर आपला स्वतंत्र शैक्षणिक परिसर उभारु शकतील. असे सरकारचे म्हणणे आहे, की यामुळे आपल्याकडे उच्च शिक्षणात एक नवा अध्याय सुरू होईल आणि हा अध्याय तरुण पिढीच्या फायद्याचा ठरेल. सरकारने हे विधेयक मांडण्यामागे ‘शिक्षणाच्या नावाखाली भारताबाहेर जाणारा पैशाचा महापूर रोखणे’ हेदेखील एक कारण पुढे केलेले आहे.
२) या विधेयकातील तरतुदींद्वारे यूजीसी कडून परवानगी मिळाल्यानंतर आणि ५० कोटी रु. सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर परदेशी शिक्षण संस्थांना भारतात आपले स्वतंत्र परिसर (campus) उघडण्यास मंजुरी देण्यात येईल. ही रक्कम त्यांच्या दृष्टीने विशेष नाही. त्यामुळे अनेक विद्यापीठे भारतात येण्यासाठी रांग लावतील. पहिल्या फेरीत तरी सुमारे ५० विदेशी विद्यापीठ आपल्याकडे तातडीने येण्यास तयार आहेत, असे समजते. त्यात अनेक अमेरिकन विद्यापीठे आपल्या देशात ‘दुकान’ थाटण्यास इच्छुक आहेत.
३) सरकारच्या म्हणण्याप्रमाणे या विद्यापीठांना सर्व केन्द्रीय संस्था जसे- यूजीसी, एआयसीटीई, इ. च्या मान्यता चाळणीतून जावे लागेल. परंतु, प्रत्यक्षात या विधेयकाच्या मसुद्यात याविषयी स्पष्टीकरण नाही.
४) या विद्यापीठांवर अंकुश ठेवणारी तसेच त्यांच्याद्वारे निर्माण होणार्‍या समस्यांवर उपाययोजना करणारी कोणतीही व्यवस्था सरकारकडे अस्तित्वात नाही. अशी व्यवस्था तयार करण्याचे कुठलेही प्रावधान या कायद्यात नाही.

विरोध कशासाठी ?

वरकरणी हे विधेयक सामान्य माणसाला अतिशय प्रभावी आणि हितकारक वाटू शकते. किंबहुना कुठलेही विधेयक मांडतांना ते अशा स्वरुपातच मांडण्यात येते. परंतु केवळ ‘विरोधाकरिता विरोध’ असे न करता विरोध करण्यामागील कारणे समाजावून घेतली, तर निश्चितच उपयोगाचे ठरेल. या विधेयकाला विरोध करण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
१) या विधेयकाद्वारे सरकारने शिक्षण क्षेत्र थेट परदेशी गुंतवणुकीकरिता (FDI in education sector) उघडून दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षेत्राचा विकास करण्यास जेव्हा शासन अपयशी ठरते, तेव्हा ते क्षेत्र अशाप्रकारे ‘जागतिकीकरणा’च्या गोंडस नावाखाली परकीय गुंतवणुकीकरिता उघडून देण्यात येते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. उदा: बँकिंग, इंशुरन्स, वीजनिर्मिती, सार्वजनिक पाणी वितरण, दूरसंचार इ. क्षेत्रे. या परदेशी गुंतवणुकीतूनच सरकारचे त्या क्षेत्रांवरील नियंत्रण कमी होते, आणि त्यांची ‘खाजगी क्षेत्रा’कडे वाटचाल सुरु होते. या कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रही खाजगीकरणाकडे जाईल, ही शक्यता नाकारता येत नाही.
२) दरसाल लाखोंच्या संख्येने भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला जातात. या विद्यार्थ्यांच्या रुपाने भारताचा पैसा विदेशात जातो, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु खर्‍या परिस्थितीप्रमाणे परदेशात शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रगत स्वरूपाचे उच्च शिक्षण जगातील सर्वोत्तम वातावरण व सुविधांसह मिळविण्याबरोबरच, आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि जीवनशैलीची या निमित्ताने ओळख होत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याचे मनसुबे असलेल्यांना ही अनुभूती अत्यावश्यकच ठरते. विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस भारतात आल्याने मात्र भारतीय विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या अनुभूतीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जीवनशैलीचा अनुभव घेणासाठी विदेशात जाणार्‍यांना सरकार या कृतीद्वारे भारतात रोखून ठेऊ शकणार नाही.
३) भारताच्या अब्जावधी लोकसंख्येत निम्मे लोक हे पंचविशी वा त्यापेक्षा खालच्या वयातील आहेत. अर्थात शिकण्याचे वय असलेला हा कुमार आणि युवावर्ग विदेशी शिक्षणसंस्थांचा खास आकर्षण बिंदू आहे. जरी या ६० कोटी तरुणांपैकी आजच्या घडीला केवळ ११ टक्केच उच्च शिक्षणाची पायरी चढताना दिसत असले, तरी ही संख्याही विदेशी विद्यापीठांच्या दृष्टीने कमी आकर्षक नाही. परदेशी शिक्षण संस्था भारतातील या विद्यार्थी-संख्येकडे केवळ एक ‘प्रचंड बाजार’ या दृष्टीने पाहत असून त्यांना भारतातील सामाजिक-शैक्षणिक प्रश्नांशी काहीही घेणे-देणे राहणार नाही, हे उघड आहे. त्यांचा भारतात प्रवेश करण्याचा उद्देश केवळ ‘नफा कमविणे’ हा राहणार असून या संस्थांमुळे भारतीय शिक्षण प्रक्रियेला यत्किंचितही मदत मिळणार नाही.
४) भारतातील शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिस्थितीनुसार देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा पुरविण्याचे कोणतेही बंधन या विद्यापीठांवर राहणार नाही. उदा: अनुसूचित जाती-जमातींकरिता आरक्षण, कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांकरिता आर्थिक सहाय्य इ.
५) ‘परदेशी आहे म्हणजे चांगलेच असणार’, असा समज करुन घेणे मूर्खपणाचे आहे. समुद्रात जाळे टाकून मासे, शंख, शिंपले आणि रत्न-मोती ही मौल्यवान जलसंपदा जशी उपसली जाते तसेच त्याबरोबरीने समुद्रातील गाळ,कचराही उपसले जातात. विदेशातून भारतात केवळ ऑक्सफर्ड, हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, केंब्रिज अशी नावाजलेलीच विद्यापीठे येतील असे नाही, तर त्यांच्यासोबतच परदेशातील अनेक कामचलाऊ आणि ‘क’ श्रेणीची विद्यापीठेही भारतात येण्याची शक्यता आहे. अशा दर्जाहीन विद्यापीठांवर आणि त्यांच्यातर्फे वाटण्यात येणार्‍या ‘क’ श्रेणीच्या पदव्यांवर शासनाचा काहीही अंकुश राहणार नाही. भारतात उच्च शिक्षणाला मागणी मोठी आहे म्हणून ‘कुणीही यावे, आणि आपले दुकान उघडावे’, असे धोरण अनुसरता येणार नाही.
६) विदेशातून सर्वोत्तम तेच भारतात येईल, अशा आपल्या धोरणात्मक कसोटीचा आजवर प्रत्येक व्यापारक्षेत्रात वारंवार कस लागलेला आहे. शिक्षणक्षेत्रातील खुलीकरणाच्या या प्रयोगात पुन्हा भारताच्या नशिबी गाळ-कचराच येणार नाही, याची खातरजमा कशी केली जाईल ? शिवाय भारतात येताना अगदी नावाजलेल्या शिक्षणसंस्थाही त्यांच्या पूर्ण सामर्थ्यांने व सक्षमतेने उतरतील काय, हाही कळीचा प्रश्न आहे. अन्यथा भारतासाठी बी अथवा सी ग्रेडचा अभ्यासक्रम आणि तो शिकविण्यासाठी त्याच श्रेणीचे शिक्षकवृंद आणि संसाधने, असा फसगतीचा अनुभव येऊ शकतो. शिवाय, जर काही वर्षांनी ‘क’ श्रेणी विदेशी विद्यापीठांनी भारतातून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला, तर विद्यार्थ्यांच्या होणार्‍या नुकसानास कोण जबाबदार राहणार ?
७) या विद्यापीठांमधील शिक्षण शुल्क, प्रवेशाचे नियम, प्राध्यापकांची निवड, अभ्यासक्रम, त्यांच्यातर्फे देण्यात येणार्‍या पदव्या, त्या पदव्यांची मान्यता या सर्वांवर कोण नियंत्रण ठेवणार ? यासंबंधी सरकारचे धोरण स्पष्ट नाही. सरकारच्या परवान्यांच्या बेड्या पायांत अडकलेली भारतीय विद्यापीठे अशा स्वातंत्र्याचा उपभोग घेणार्‍या विदेशी विद्यापीठांपुढे काय टिकाव धरतील ?
८) परदेशी विद्यापीठांना निधीचा अभाव राहणार नाही. त्यामुळे पारंपारिक भारतीय विद्यापीठांमधील प्राध्यापकांना चांगला पगार देऊन आकर्षित करणे त्यांना जड नाही. ‘ब्रॅण्ड नेम’ चा त्यांना नक्कीच फायदा होईल. यामुळे ‘देशी विरुद्ध विदेशी विद्यापीठे’ असा सामना रंगेल.
९) देशी विद्यापीठांची गळचेपी करून विदेशी विद्यापीठांना मुक्त वाट देण्याचे केंद्राचे धोरण असेच चालू राहिले, तर कालांतराने देशी विद्यापीठांचा दर्जा महानगरपालिकेच्या शाळांसारखा घसरेल, आणि ही विद्यापीठे बंद पडून परिणामी आपल्याला उच्च शिक्षणाकरिता केवळ परकीय विद्यापीठांवर अवलंबून रहावे लागेल.
१०) आजमितीला भारतात चांगल्या प्रतीचे उच्च शिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. उदा: आयआयटी, आयआयएम, लॉ स्कूल्स, इ. या शिक्षण संस्थांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यात येते. या संस्थांमधील विद्यार्थी जगभरात जाऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारतीय गुणवत्तेचे दर्शन घडवितात. अशा देशी शिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांची संख्या वाढविणे हे उद्दीष्ट न ठेवता सरकार त्यांचे पंख अधिकाधिक छाटून विदेशी संस्थांना त्यांच्या स्पर्धेत उतरविण्याचा घाट घालीत आहे.
११) प्राचीन काळापासून भारतात विद्यादान हे पुण्यकर्म मानले गेले आहे. पाश्चिमात्य देशांत शिक्षणाचा गंधही नव्हता, त्या वेळेस भारतात पाच आंतरराष्ट्रीय ख्यातीची विद्यापीठे अस्तित्वात होती. या विधेयकात सरकारने शिक्षण ही बाजारू वस्तू असल्याचे पुन्हा एकदा सांगून ते विकून जास्तीत जास्त नफा कमाविण्याची मुभा विदेशी शिक्षण संस्थांना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे भारतातील ‘शैक्षणिक बाजारपेठ’ लक्षात घेऊन इथल्या विद्यार्थ्यांना लुटण्यासाठी विदेशी शिक्षण संस्था मोठ्या संख्येने येतील. शिवाय भारतीय विद्यार्थ्यांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी जास्त साधनसुविधा उपलब्ध करण्याची स्पर्धाही लागेल. त्या तुलनेत देशी संस्था टिकतील काय? इंग्रजी माध्यमाच्या सुसज्ज शाळांमुळे प्रादेशिक माध्यमातील शाळा ज्या पद्धतीने ओस पडत आहेत, तशीच परिस्थिती विदेशी शिक्षण संस्थांच्या आगमनामुळे देशी शिक्षण संस्थांवर ओढविण्याची भीती आहे. शिवाय विदेशी शिक्षण संस्थांचे शिक्षण प्रचंड महागडे राहणार असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करताना देशी शिक्षण संस्थांतील शिक्षणही आणखी महागडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नफ्या-तोट्याच्या या स्पर्धेत शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय होईल ?
१२) सरकारच्या म्हणण्याप्रमाणे विदेशी विद्यापीठांशी स्पर्धेतून भारतातील उच्च शिक्षणावर गुणात्मक स्वरूपाचा सकारात्मक परिणाम घडून येईल हे जरी आपण क्षणभर गृहित धरले, तरी त्या आधीच्या प्राथमिक व माध्यमिक या शिक्षणाच्या दोन मूलभूत टप्प्यांचे काय? पायाच जेथे नीट घडला नसेल, तेथे कळसाला दिल्या जाणाऱ्या सुवर्ण मुलाम्याचे काय कौतुक ?
१३) उद्योगक्षेत्रात आर्थिक मनमानी कारभाराची स्वतंत्र बेटे जशी ‘सेझ’ मार्फत उभी राहत आहेत, तशीच भारतीय कायदा आणि परंपरेने स्थापित नियम-मानदंडांना फाटा देणारी ‘शैक्षणिक सेझ’ नावाची बांडगुळे शिक्षणक्षेत्रात उगविलेली दिसतील काय ? अन्यथा जागतिकीकरणाच्या सध्याच्या धबडग्यात आणखी एका विदेशी अंधानुकरणाच्या प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्र अधोगतीस लागल्याचे अनुभवास येऊन रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण होऊ नये !

विरोध कुणाकुणाचा ?

हा सर्व खटाटोप ज्यांच्याकरिता सुरु आहे असे सांगण्यात येते, त्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश देशव्यापी संघटनांनी या काळ्या कायद्याला आपला विरोध दर्शविला आहे. त्यात डाव्यांची एआयएसएफ ही संघटना आघाडीवर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आधीपासूनच कडक विरोध दर्शविला आहे. सोबतच इतर डावे पक्ष, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष व राष्ट्रीय जनता दल, या पक्षांनीदेखील विरोध केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती, स्व. जा. मंच, यांनीदेखील या विधेयकाचा कडाडून निषेध केला असून त्याविरोधात प्रस्ताव पारित केलेले आहेत. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली, तरीही सद्यस्थितीत (हा लेख लिहीपर्यंत) हे विधेयक संसदेत पारित झालेले नाही. मात्र, बहुमताच्या जोरावर सरकार कोणत्याही क्षणी ते पारित करुन घेईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे, भारताला शैक्षणिक पारतंत्र्यात जाण्यापासून वाचविण्यासाठी विविध सांसदीय आयुधांचा वापर करून प्रत्येकाने या काळ्या विधेयकाविरुद्ध सरकारदफ्तरी तीव्र निषेध नोंदविण्याची गरज आहे.

-अमेय पत्की, नागपूर. (९४२२१२३६२३)


(काही संदर्भ : विविध वृत्तपत्रांत प्रकाशित झालेले माहितीपर लेख)


मंगळवार 16 मार्च 2010

मा फलेषु कदाचन . . .

वर्षभरापूर्वी जेव्हा मोठ्या उत्साहाने हा ब्लॉग तयार केला, तेव्हा मराठी ब्लॉगविश्वातील इतर प्रतिष्ठित ब्लॉगांपासून प्रेरणा मिळाली होती आणि हा उपद्‌व्याप सुरु केला. मात्र काही दिवस नियमितपणे इथे लिहिल्यावर या ब्लॉगांच्या दुनियेत आपण किती क्षुल्लक आहोत, हे लक्षात आले. वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ब्लॉगांची वाचकसंख्या लाखांच्या घरात, आणि आपल्या ब्लॉगवर बोटांवर मोजण्याइतकेच वाचक ! इतर श्रेष्ठ लेखकांचे लेखन वाचून आपल्याला चढलेले अवसान ‘उसने’ आहे की काय, अशी भीती वाटू लागली. ब्लॉगला मिळालेला हा ‘सेटबॅक’ पाहून आपल्या लेखनातच खोट आहे, असाही एक विचार मनाला चाटून गेला. वाचकांच्या ज्या भरघोस प्रतिसादांची दिवास्वप्ने पाहत हा ब्लॉग सुरु केला, तसे प्रतिसाद मिळण्याकरिता अजून फार मोठा टप्पा गाठावा लागणार, याची मला जाणीव झाली. त्यामुळे कित्येक दिवस या ब्लॉगवर काही नवे लेखन केले नव्हते.
मात्र गेल्या आठवड्यात ब्लॉग उघडून पाहिला असता, वाचकांची संख्या किंचित वाढलेली दिसली. म्हणून विचार आला, की आपण जरी आशा सोडली असली, तरी कुणीतरी भरकटलेला ‘नेट’करी आपला ब्लॉग नक्कीच पहात असणार ! त्यातील एक दोन वाक्ये का होईना, नक्कीच डोळ्याखालून घालत असणार ! हेदेखील काही कमी नाही. आपण जे काही लिहितो, ते इतरांना आवडो अथवा न आवडो; ‘आपण काहीतरी लिहिले’, यातून मिळणारा निर्मितीचा आनंद खरंच वेगळा असतो. आपल्या विचारांनी, आपल्या भाषेत, आणि आपल्या मनातले आपण कागदावर मांडू शकतो, याचे समाधान वाटते. त्यामुळे आज गुढीपाडव्यापासून (पुन्हा एकदा मुहूर्त !!) परत इथे खरडण्याचा विचार आहे. पण आता जे काही लिहीन, ते केवळ स्वतःकरिता ! स्वतःच्या समाधानासाठी ! वाचकसंख्येची अपेक्षा न ठेवता ! (ती वाचकांची संख्या मोजण्याची पाटीही काढून टाकावी असा विचार आहे.) कृष्णाने सांगितलेले ‘कर्मण्येवाधिकारस्ते . . ’ स्मरून आता पुनश्च हरि ॐ !

चैत्र शु. प्रतिपदा-नवसंवत्सर शुभारंभ.
विकृतिनाम संवत्सर युगाब्द ५११२.
श्री शालिवाहन शके १९३२, विक्रमी संवत्‌ २०६७.
ख्रिस्ताब्द दि. १६ मार्च २०१०

या लेखनाबद्दल आपले मत नोंदवा :-